अहमदनगर - राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखू मिश्रित मावा तयार करणाऱयांविरुद्ध बोधेगाव येथे कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 1 लाख 64 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. शेख जमीर रशीद आणि रवींद्र पंढरीनाथ शिंदे हे त्यांच्या राहत्या घरात मशीनच्या सहाय्याने सुगंधी तंबाखू मिक्स करून मावा तयार करत होते. पोलीस कॉन्स्टेबल मनोज गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, राहुल सोळुंके, रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, सागर ससाने, रोहिदास नवगिरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन पंचासमक्ष त्या ठिकाणी जाऊन खात्री केली.
जमीर रशीद शेख आणि रवींद्र पंढरीनाथ शिंदे याच्या घरामध्ये सुगंधी तंबाखूचे पूडे, तयार मावा, मावा तयार करण्याच्या दोन इलेक्ट्रिक मिक्सर मशीन असा एकूण 1 लाख 64 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला. गुन्हे शाखेने तो जप्त केला. पंचनामा करून पुढील कारवाईसाठी शेवगाव पोलिसांकडे देण्यात आला.
ही कारवाई अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक, सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि मंदार जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.