अहमदनगर (राहुरी) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, ऑस्ट्रेलियाचे संस्कृती, कला व आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाचे मंत्री श्री. डेव्हिड टेम्पलमन उपस्थित होते. ( Hatma Phule Agricultural University ) यावेळी झालेल्या सामंजस्य करारावर संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व आंतरराष्ट्रीय मरडॉक विद्यापीठाचे कुलपती श्री. केली स्मिथ यांनी सह्या केल्या. याप्रसंगी मरडॉक विद्यापीठाचे संचालक डॉ. राजीव वार्ष्णेय, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासळकर व कुलगुरुंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.
एकमेकांच्या विद्यापीठांतर्गत अभ्यास करता येणार - ऑस्ट्रेलियन चमूचे नेतृत्व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रांताचे उपमुख्यमंत्री व पर्यटन, व्यापार आणि विज्ञान मंत्री श्री. रॉजर कुक यांनी केले. या सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषी शिक्षण व संशोधनाची देवाण-घेवाण होणार आहे. यामध्ये दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना एकमेकांच्या विद्यापीठांतर्गत अभ्यास करता येईल.
सामंजस्य करारावर समाधान व्यक्त - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यावेळी म्हणाले, की या सामंजस्य करारामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून कृषी क्षेत्रामधील नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. डॉ. राजीव वार्ष्णेय यांनी सांगितले, की या करारामुळे मरडॉक विद्यापीठाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. श्री. डेव्हिड टेम्पलमन यांनीही या सामंजस्य करारावर समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा - उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा भरणार उमेदवारी अर्ज