अहमदनगर - राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतीमालाच्या वाहतूक आणि विक्री व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. सरकारकडून कोणत्याही उपाययोजना नाहीत, जगाचा पोशिंदाच आज अडचणीत सापडला आहे. दूध ,भाजीपाला, धान्य शेतकरी आज पुरवत आहेत. मात्र, शेतकरीच आज मोठ्या संकटात आहे. अनेक अडचणींचा सामना करत शेतकरी राबत आहे.
शेतीमालासाठी असलेली पणन व्यवस्था आज कुठे आहे? असा सवाल भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी करत सरकारवर निशाणा साधला आहे. अत्यावश्यक असलेल्या शेतीमालाची साठवणूक आणि विक्री व्यवस्था निर्माण करण्याची गरज असून सरकारनेच विक्री आणि वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातच अनेक ठिकाणी ऊसतोडणी कामगार अडकले आहेत. ऊस तोडणी कामगारांना घरी जाण्यासाठी राज्य सरकारने व्यवस्था करणे गरजेचे असल्याचेही विखे पाटील म्हणाले.