अहमदनगर - राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री उशिरा भाजपने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा फटका अर्थातच सुजय विखे यांना बसणार आहे. या परस्थितीत राधाकृष्ण विखे यांनी गांधी, सुवेंद्र यांच्या सोबत जवळपास ३ तास बंद खोलीत चर्चा केली. मात्र, त्यांच्यातील भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विखे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगताना मुख्य प्रश्नांना बगल दिली.
राजकारणात असल्यामुळे जुने संबंध असल्याने चहा-पाण्याला आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी उमेदवाराचा आपण प्रचार करणार नाही हे पुन्हा स्पष्ट केले. पक्षाने आपल्याला स्टार प्रचारक केले असल्याने पक्षाचा आदेश आल्यावर पाहू, असे सांगतानाच आपण मुला प्रमाणेच भाजपमध्ये जाणार का आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय का? या प्रश्नावर त्यांनी हसत तुम्हाला मी इथे (काँग्रेसमध्ये) सुखी असलेले बरे वाटत नाही का? असे उत्तर दिले.
एकूणच राधाकृष्ण विखे यांनी खासदार गांधी यांच्या भेटीचे नेमके कारण सांगितले नसले तरी गेल्या चार-पाच दिवसांपासून विखे हे नगर दक्षिणेत तळ ठोकून असून युतीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या भेटी निश्चितच सुजय यांच्या साठीच असल्याचे एव्हाना समोर आले असले तरी त्यांनी अधिकृतपणे माध्यमांशी बोलणे टाळले आहे. सुवेंद्र गांधी अपक्ष मैदानात उतरल्यास त्याचा चांगलाच फटका सुजय यांना बसू शकतो. त्यामुळे सुवेंद्र यांनी उमेदवारी करू नये आणि नाराज असलेल्या खा. गांधी यांनी प्रचारात सक्रिय होऊन मदत करावी हाच आजच्या भेटी मागे उद्देश असल्याचे बोलले जात आहे. ऐन निवडणुकीत विरोधी पक्षनेता आणि स्टार प्रचारक राजकीय विरोधकांच्या दारात आल्याने विखे-गांधी भेट एक मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे.
राजकीय चर्चा झाली, पण अशा चर्चा उघड करायच्या नसतात - खासदार गांधी
गांधी यांनी मात्र राधाकृष्ण विखे यांच्या सोबत राजकीय चर्चा झाल्याचे मान्य केले. मात्र, सगळ्याच राजकीय चर्चा उघड बोलायच्या नसतात, असेही ते म्हणाले. जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून विखे कुटुंबाशी आमचे १९८५ पासून संबंध असल्याचे सांगत आता सुजय हे उमेदवारी करत असल्याने त्याबाबत चर्चा झाल्याचे गांधी यांनी सांगत विखे कशासाठी भेटले याचा एकप्रकारे खुलासा केला. सुवेंद्र गांधी यांच्या उमेदवारीला युवकांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी मी जनसंघापासून भाजपचेच काम करत असल्याने सुवेंद्र पण उमेदवारी न करता पक्षाचे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.