अहमदनगर - राहाता तालुक्यातील प्रवरा परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत आपले योगदान देणाऱ्या सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. तसेच त्या डॉ. अशोक, राजेंद्र आणि गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मातोश्री होत्या.
ग्रामीण भागात प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या उत्कर्षासाठी उल्लेखनीय रचनात्मक कार्य करून त्यांनी महिलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने, मातोश्री रमाबाई आंबेडकर आदर्श महिला पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्काराने सिंधुताईंना सन्मानित करण्यात आले होते.
सिंधुताई विखे-पाटील यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून प्रियदर्शनी सार्वजनिक वाचनालय आणि महिलांसाठी पहिली सहकारी पतसंस्था सुरू केली. याच संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणतांबा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केले. लोणी येथे प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक महाविद्यालयाची स्थापनाही करून त्यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला दिशा देण्याचे मोठे काम केले.
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी 1997 साली महिलांकरिता महिला शिवणकला प्रशिक्षण केंद्र, महिला लघुउद्योग केंद्र, अद्वैत महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले. महिला बचत गट मेळावे, माता बालसंगोपन शिबीर, अशा सामाजिक उपक्रमातून सिंधुताई विखे-पाटील यांनी महिलांना सामाजिक कार्यात सक्रियतेने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.