अहमदनगर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव त्यांच्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला असून काँग्रेस व भाजपमधील आणखी काही नेते केसीआर यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता, यामुळे काही काळ फक्त लोकांचे मनोरंजन होईल, असा चिमटा त्यांनी काढला.
'उद्धव ठाकरेंच्या चोराच्या उलट्या बोंबा' : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काल 'गद्दार दिवस' साजरा केला. याचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. भाजप बरोबर युती करत विधानसभा निवडणुका लढवल्या त्यामुळे त्यांचे 50 आमदार निवडून आले. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपशी गद्दारी केली. विचारांशी गद्दारी केली म्हणून त्यांना 40 लोक सोडून गेले. अशा लोकांनी गद्दार दिवस साजरा करण्याआधी स्वत:ला एकदा आरशात पहावे', असा टोला त्यांनी लगावला.
'अंबादास दानवेंच्या डोक्यावर परिणाम झाला' : राज्य उत्पादन, वन, महसूल या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या बदल्यांवर संशय व्यक्त करत, यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याच्या चौकशीचीही मागणी केली आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया देत, आधी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता, आता अंबादास दानवेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखेंच्या पद्मश्री विखे साखर कारखाना आणि इतर संस्थांमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक याच्या संस्थेकडून मोठा निधी मिळाल्याचा गंभीर आरोप केला होता. आपण लवकरच याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले होते.
हेही वाचा :