अहमदनगर - संगमनेर तालुक्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सेवा दिली जात आहे. परंतु, या सेवा खरच संबंधितांना मिळतात का याची प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे यांनी अचानक तपासणी केली. त्यामुळे यंत्रणेतील अनेक धक्कादायक त्रुटी पाहणीत समोर आल्या आहेत.
संगमनेरमध्ये जवळपास ६० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. या पाणीपुरवठा संदर्भात अनेक तक्रारी होत्या. नागरिकांना मिळणारे पाणी दुषित होते. तसेच आचारसंहितेचा बाऊ करत येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेर गाठत टंचाई आढावा बैठक घेतली आणि प्रशासनाला दुष्काळाबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर देखील काहीच बदल होत नसल्याचे चित्र होते.
त्यामुळे सोमवारी प्रांताधिकारी मंगरुळे यांनी दुष्काळाने अति कठीण बनलेल्या पठारभागाची पाहणी करत वास्तव समजून घेतले. या पाहणीत मंगरुळे यांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात त्रुटी आढळल्याने त्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले.