शिर्डी (अहमदनगर) Protests Against Saibaba Sansthan: साईबाबा संस्थानच्या तत्कालीन व्यवस्थापन मंडळानं भाविकांना साई दर्शनाला जाताना ऊन, वारा, पाऊस यांचा त्रास होऊ नये म्हणून सन 2018 साली तब्बल 109 कोटी रुपयांची नवीन 'दर्शन क्यू कॉम्प्लेक्स' बांधण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्ष या नवीन दर्शन लाईनच्या कामास सुरुवात झाल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीत ही इमारत बांधून पूर्ण करण्याच्या अटीवर ठेकेदारास काम देण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात तीन वर्षांचा कालावधी या दर्शन लाईन बांधण्यासाठी घेण्यात आला. आता नवीन दर्शन लाईनचे (क्यू कॉम्प्लेक्स) काम पूर्ण होऊन तब्बल एक वर्ष झाले; मात्र तरी याचे उद्घाटन केवळ राजकीय दबावापोटी आणि पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे उद्घाटन रखडले आहे.
दर्शन लाईनचे उद्घाटन करा; अन्यथा...: भाविकांच्या सुख सुविधेसाठी नवीन क्यू कॉम्प्लेक्स बांधण्यात आलाय. या क्यू कॉम्प्लेक्ससाठी राज्य व केंद्र सरकारकडून एक रुपयाही साई संस्थानने घेतलेला नाही. भाविकांनी दान केलेल्या पैशातूनच ही नवीन दर्शन लाईन (क्यू कॉम्प्लेक्स) बांधण्यात आलाय. मात्र, नवीन दर्शन लाईनच्या उद्घाटनासाठी केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी, राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे विलंब केला जात आहे. तसंच त्रिसदस्यीय समिती राजकीय दबावापोटी चालढकल करत असल्याचा आरोप साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केलाय. साई भक्तांच्या हस्ते या दर्शन रांगेचे लोकार्पण येत्या 14 ऑक्टोबर पर्यंत करावे. अन्यथा, आम्ही शिर्डी ग्रामस्थ, माजी विश्वस्त व साई भक्तांसह 15 तारखेला घटस्थापनेच्या दिवशी प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याचा निर्वाणीचा इशारा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीला यावेळी दिला आहे.
साई संस्थानची डोकेदुखी वाढणार : साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी साई संस्थान आता देशभरात साईंची मंदिरे उभारत त्याचे व्यवस्थापनही करणार असल्याची घोषणा केल्यानंतर या योजनेस शिर्डीकरांकडून विरोध होतोय. शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी अनेक सुविधांची कमतरता असताना आणि शिर्डीचं व्यवस्थापन बघतानाच साई संस्थानच्या नाकीनऊ येत असताना साई संस्थान हा खटाटोप का करतय? असा सवाल करत साई संस्थानच्या माजी विश्वस्त अनिता जगताप आणि त्याचे पती माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनीही 5 ऑक्टोबर पासून साईबाबा मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वार समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. नवीन दर्शन लाईन तसंच शैक्षणिक संकुलचे येत्या 14 ऑक्टोबर पर्यंत साईबाबा संस्थान कडून उद्घाटन करण्यात आले नाही, तर साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त साईबाबा संस्थान विरोधात आंदोलन करणार आहेत. यामुळे साई संस्थानची डोकेदुखी वाढणार आहे.
हेही वाचा:
- Saibaba Sansthan Trust : साई संस्थान देशभरात उभारणार साईबाबांची मंदिरं; निर्णयाला शिर्डीकरांचा विरोध
- Shirdi News : साई संस्थानच्या 'त्या' कर्मचाऱ्यविरोधात अखेर गुन्हा दाखल; ई टीव्ही भारतच्या बातमीचा परिणाम
- Shirdi Saibaba Sansthan News : विद्यार्थ्यांचे साई संस्थान विरोधात 'या' मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू