अहमदनगर - कोरोनाच्या प्रादूर्भावाने जग त्रस्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नॉन कोविड रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यातही सर्वात जास्त गर्भवती महिलांची. प्रसूतीसाठी सरकारी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल व्हावेच लागते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शासकीय जिल्हा, ग्रामीण जिल्हा रुग्णालये हे कोविड सेंटर म्हणून राखीव करण्यात आली आहेत. तर, खासगी रुग्णालयातील बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे बंधन आहे. या परिस्थितीत महिलांची प्रसूतीसाठी मोठी अडचण होत आहे.
कोविडमुळे अनेक हक्कांची शासकीय रुग्णालये राखीव झाल्याने गोर-गरीब, मध्यमवर्गीय महिला रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. मात्र, शासकीय स्तरावर रुग्णालयांमध्ये सुविधा असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. तर, खासगी रुग्णालयात आम्ही जास्त दर आकारत नाही, असे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी विशेष सुविधा असल्याचे शासकीय रुग्णालयांनी स्पष्ट केले आहे.
एकट्या अहमदनगर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात बारा हजारावर प्रसूती होतात. तर शहरी भागात पाच हजारावर प्रसूती या खासगी रुग्णालयात होतात. मात्र, सध्या कोरोनाच्या काळात अनेक शासकीय जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये ही कोविडसाठी राखीव असल्याने निश्चितच अनेक गरजूंना खासगी रुग्णालयात जावे लागत आहेत. खासगी रुग्णालयात अधिकचे दर असतानाच कोरोनाच्या संकटात पीपीई किट, इतर चाचण्या यांचे बिल आकारल्या जातात अशा तक्रारी आहेत. या परिस्थितीत सरकारने महिलांसाठी स्वतंत्रपणे प्रसूतिगृह निर्माण करावीत अशी मागणी होत आहे.