शिर्डी (अहमदनगर) - मुंबई येथील काही भाविकांनी शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल साडेसात लाख रूपयांचे पीपीई कीट आणि मास्कची भेट दिली आहे. कोरोनाच्या महामारीपासून शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण होण्यास मदत व्हावी, या हेतून हे वाटप करण्यात आले. यात 500 पीपीई कीट आणि 5 हजार एन 95 मास्कचा समावेश आहे.
मुंबई येथील राजेश ध्रुव आणि हितेश सध, संजय शहा यांनी हे मास्क आणि कीट साई संस्थानला दिले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, तुषार शेळके तसेच खरेदी अधिकारी कुणाल आभाळे उपस्थितीत होते.