अहमदनगर - कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेली गोवंश जातीची ४१ जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय मिटके यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या सर्व गोवंश जनावरांची किंमत चार लाख आठ हजार रुपये इतकी आहे.
उपअधीक्षक मिटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे भिंगार परिसरात डांबून ठेवले होती. त्यानंतर उपअधीक्षक मिटके आणि भिंगार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने मुकुंद नगर येथील सी. आय. व्ही. कॉलनी मागील शेतात 31 गोवंश जातीची जनावरे तसेच नागरदेवळे गावाजवळ बाबा शेख यांच्या शेतात गोवंश जातीची ११ जनावरे असे एकूण ४१ जनावरे पोलीस पथकाला आढळून आली.
यानंतर ही सर्व जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी वसीम मुल्ला, सादिक अल्लाबक्ष, अल्कमश चांद शेख, इलुभाई कुरेशी आणि त्याचा भाऊ अशा एकूण पाच आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.