अहमदनगर- शिर्डी भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी आजपासून साईसंस्थान, नगरपंचायत आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे. साई मंदिर परिसरातून मंगळवार सकाळपासून ७० भिक्षेकरी शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी भिक्षेकरू सुधार गृहात करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार पोलिसांसमोर आले आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश भरातून दररोज हजारो भाविक येत असतात. या भाविकांना साई मंदिर परिसरात भिक्षेकरू त्रास देत असल्याने साई संस्थान, नगरपालिका आणि शिर्डी पोलिसांनी या भिक्षेकरुंच्या विरोधात संयुक्त कारवाई मोहिम आज पासून सुरू केली आहे.
आतापर्यंत ७० भिक्षेकरुंना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात ३३ महिला आणी ३७ पुरुष भिक्षाकरू असून यांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेश नुसार महिलांची रवानगी मुंबईतील चेंबूर येथील सुधार गृहात करण्यात आली असून पुरुषांची रवानगी अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील विसापूर भिक्षाकरू सुधार गृहात करण्यात आली आहे. या पुढे देखील ही मोहिम सुरू राहणार असल्याची माहिती शिर्डी उप-विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने बाहेरच्या राज्यातील काही लोक शिर्डीत येऊन भिक्षा मागुन पैसे कमवण्याचा व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाई दरम्यान पोलिसांच्या लक्षात आला. तसेच वृद्धांना आणि लहान मुलांना सकाळी काही लोक शिर्डीत भिक्षा मागण्यासाठी सोडतात आणि संध्याकाळी परत घेऊन जातात. या रॉकेटमधील एक जण पोलिसांच्या हाती लागला आहे. या मागचा मुख्य सूत्रधारही लवकरच पोलिसांच्या हाती लागणार असल्याची माहिती शिर्डी उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.