अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील साकुर मांडवे रस्त्यावरील आदिक खेमनर यांच्या मालकीचा भगवान पेट्रोलियम पेट्रोल पंप आहे. नेहमीप्रमाणे रविवारी दिवसभर पेट्रोल पंप सुरू होता. रात्री काम आटोपून पंप मॅनेजर दत्ता शेंडगे हे घरी गेले. तर यावेळी सुनील गिरे व विलास कातोरे हे दोघे कर्मचारी तेथे काम पहात होते. रात्री 10.45 च्या सुमारास हे दोघे कर्मचारी दिवसभराचा हिशेब करीत असताना दोन दुचाकीवरून तिघे तरुण तोंडाला कापड बांधून पेट्रोल भरण्यासाठी आले. विलास कातोरे हे पेट्रोल देण्यासाठी बाहेर गेले असता पेट्रोल भरल्यानंतर हे तरुण पैसे न देता थेट पंपाच्या कॅबीनमध्ये घुसले. यावेळी तिघांपैकी एकाने थेट बंदूक काढून सुनील गिरे यांच्यावर रोखत पैसे काढून देण्याचा इशारा केला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदारलेल्या या कर्मचाऱ्यांनी कोणताही विरोध न केल्याने या दरोडेखोरांनी येथील सुमारे 2 लाख 50 हजार 747 रुपयांची रोकड लुटून नेली.
आणखी एका दुकानात दरोडा: हे दरोडेखोर तेथून निघून गेल्यावर या घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक मदतीला धावून आले. मात्र तोपर्यंत हे चोर पसार झाले. याबाबत सुनील गिरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या पेट्रोल पंपांवर दरोडा पडण्यापूर्वी याच दरोडेखोरांनी घारगाव बसस्थानकाजवळ असणाऱ्या लक्ष्मी टायर वर्क्स या दुकानाचे मालक अनुदेव अनंत ओटुशेरी यांच्या दुकानात घुसून त्यांच्या खिशातील सर्व रोकड, दोन मोबाईल व त्यांची मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 17 सी ए 7207) पळवून नेली. या चोरीला विरोध केल्याने चोरट्यांनी या दुकान मालकावर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. याच गाडीचा वापर पुढे साकुर पेट्रोल पंपावर दरोड्यात करण्यात आला. एकाच वेळी या तीन दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.
आरोपींचा मागमूसही नाही: या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात या पठार भागात चोरी, दरोड्याच्या अनेक घटना घडल्या असताना यातील एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात घारगाव व संगमनेर पोलीस अपयशी ठरले आहे. पोलीसांच्या या भूमिकेमुळे मात्र येथील नागरिक मात्र पुरते हादरून गेले आहे.
नाशिकमधील पेट्रोल पंपावर दरोडा: नाशिकमधील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात असलेल्या विशाल पेट्रोल पंपवर 24 नोव्हेंबर, 2020 रोजी दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये अज्ञात चोरट्याने जवळपास पाच लाखांची रोकड लांबवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या अज्ञात चोरट्यावर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू करण्यात आला. मात्र नवीन नाशिक भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून बळावत असलेली गुन्हेगारी रोखण्यास पोलीस कठोर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता.
हेही वाचा: Challenge To Agnipath Scheme : 'अग्निपथ'ला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली