अहमदनगर - शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदारसंघात सांयकाळी 5 वाजेपर्यंत 61.88 टक्के मतदान झाले होते. मतदारसंघातील 361 मतदानकेंद्रांवर 3 लाख 40 हजार 860 मतदारांपैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 लाख 10 हजार 756 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.पण, काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी या दोन्ही मतदारसंघांत मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. दोन्ही उमेदवार पाथर्डी तालुक्यातील असल्याने शेवगावची भूमिका महत्वाचे ठरणार आहे. पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील मतदारांनी रस्त्याच्या कामासाठी मतदानावर बहिष्कार टाकल्याने तेथे एकही मतदान झाले नाही. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सुसरे व भालगाव या दोन ठिकाणी नियंत्रण युनीट, तर ढोरजळगाव, शेसुसरे, भालगाव या तीन ठिकाणी मतदान युनिट तर २२ ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रात त्रृटी आल्याने या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया काही वेळेसाठी बंद पडली. मात्र, शेवगाव शहरातील खालची वेस येथील उर्दू मुलींच्या शाळा व चापडगाव काकडे हायस्कूल, शास्त्रीनगर शाळा लक्ष्मी नगर शाळेत सहानंतर मतदानासाठी लागलेल्या मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळा, काकडे विद्यालय, चापडगाव येथील मतदानकेंद्राबर मतदानाची सायंकाळी सहाची वेळ संपल्यानंतरही रांगा असल्याने तेथे मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती.
रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने अंदाजे 67 टक्के मतदान झाले. दिवसभर निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. विनोद भामरे, नामदेव पाटील हे मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवून होते.