अहमदनगर - पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या विजय औटी यांनी पराभवाचा जोरदार धक्का देत निलेश लंके हे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आले होते. त्यानंतर काल त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अण्णा हजारे यांनी लंकेंचे अभिनंदन करत, त्यांना समाजाचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला.
पारनेर मतदारसंघ हा पूर्वी कम्युनिस्ट पक्षांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. 2004 साली मात्र, काँग्रेसचे विजय औटी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला. तिथून पुढे तीन वेळा सलग विजय मिळवत त्यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औटी यांना विधानसभा उपाध्यक्षपद मिळाले होते. मात्र पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असलेले निलेश लंके यांच्यात आणि औटी यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले आणि लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पेटून उठलेल्या लंके यांनी मतदारसंघात नियोजनबद्ध संघटना उभी करत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले.
याच पार्श्वभूमीवर, वजनदार समजल्या जाणाऱ्या औटी यांना मोठ्या मताधिक्याने मात देत निलेश लंके यांनी मिळवलेला विजय मोठा मानला जात आहे.
हेही वाचा : नगर जिल्ह्यात पुन्हा आघाडी; भाजपच्या गडाला खिंडार, तर सेनेचा एकमेव शिलेदारही पराभूत