अहमदनगर - जामखेड इथल्या सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष करत 'ते ज्या उमेदवाराच्या प्रचाराला जातात, तो उमेदवार पडलाच म्हणून समजायचे' असा बोचरा टोमणा मारला. बुधवारी जामखेडच्या बाजरतळावर राष्ट्रवादीच्या रोहित पवारांसाठी भाजपच्या राम शिंदें विरोधात धनंजय मुंडे यांनी सभा घेतली होती. गुरूवारी त्याच ठिकाणी राम शिंदेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पंकजा यांनी शिंदेंचा विजय पक्का झाला आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन
ते आमच्यात होते तेंव्हा आमची सत्ताच येत नव्हती. त्यांनी पक्ष सोडला आणि आमची सत्ता आली, असा टोलाही पंकजांनी लगावला आहे.राम शिंदे हा एक सालकऱ्याचा मुलगा आहे. बाहेरची धनदांडगी शक्ती इथे आपल्या विरोधात आहे. मात्र, येथील जनता आपला स्वाभिमान जागृत ठेवून असून या बारामतीच्या उमेदवाराला येत्या 24 तारखेला कर्जत-बारामती बस मधे बसवून परत पाठवल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास पंकजा यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी झालेल्या सभेसाठी खासदार सुजय विखे, शिवसेना उपनेते रमेश खाडे उपस्थित होते.