अहमदनगर - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातलेली असताना शिर्डीत रविवारी पहाटे साई परिक्रमा उपक्रम झाला. राज्यात महामारी प्रतिबंधक कायदा लागू असताना रविवारी शिर्डीत परिक्रमा आयोजीत करु नये, असे आदेश शिर्डी ग्रीन अँन्ड क्लिनच्या सदस्यांना प्रशासनाने दिले होते. मात्र, तरीही परिक्रमा काढण्यात आली. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिक्रमा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सदस्यांना नोटीस बजावत चौकशी करुन न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याचे शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी सांगितले आहे.