शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यातील नागरिकांच्या फेरफार नोंदीबाबत तहसील कार्यालात मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. खातेदारांच्या फेरफार नोंदी व इतर फेरफार कामकाज निर्गतीबाबत तहसील प्रशासनाने संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना वेळोवेळी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. परंतु, फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या कामकाजाबाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून विलंब होत असल्याचे समोर आले आहे. तसेच, यासंदर्भातील कागदपत्रे नागरिकांकडूनही स्वीकारले जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून, त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, तहसील कार्यालय राहाता येथे प्रलंबित फेरफार निर्गत करण्यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारपासून सुरुवात
या शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक (31 मे) रोजी राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडळातील नागरिकांसाठी, मंगळवारी (1 जून) रोजी बाभळेश्वर मंडळातील नागरिकांसाठी, बुधवार, (2 जून) रोजी शिर्डी मंडळातील नागरिकांसाठी, गुरुवार (3 जून)रोजी लोणी मंडळातील नागरिकांसाठी आणि शुक्रवार, (4 जुन) रोजी राहाता मंडळातील नागरिकांसाठी करण्यात आले आहे. दरम्यान, या दिवसांत नमूद केलेल्या मंडळातील मंडळ अधिकारी व तलाठी सकाळी 11 वाजता कामकाज पूर्ण करणार आहेत. तसेच, लॅपटॉप, डाटा कार्ड, फेरफार मंजुरीबाबत आवश्यक कागदपत्रांसह ते राहाता तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, येथील प्रलंबित फेरफार नोंदी, फेरफार रजिस्टर, ओडीसीबाबत कामकाज करणार आहेत. मंडळातील खातेदारांना नोंदीबाबत अडचणी असल्यास, संबधित तारखेला तहसील कार्यालय राहता येथे संपर्क करावा, असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.
हेही वाचा - पंडित नेहरु, गांधींच्या पुण्याईवर देश चालतोय, मोदींनी आत्मचिंतन करावे - संजय राऊत