शिर्डी(अहमदनगर) - कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साईबाबा मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, द्वारकामाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अजुनही बंद असल्याने साई संस्थानने द्वारकामाई मंदिराचे प्रवेशद्वार लवकरात लवकर खुले करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिर्डीतील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्वाती परदेशी यांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने साईमंदिरासह द्वारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले होते. शासनाच्या आदेशानंतर मंदिर खुले झाले. मात्र, गर्दी टाळण्याचे कारण पुढे करत मंदिर प्रशासनाने द्वारकामाईचे मुख्य प्रवेशद्वार अद्याप बंदच ठेवले आहे.
साईबाबांची हयात या द्वारकामाईत गेली. बाबांनी याच द्वारकामाईत धुनी पेटवली. समाधी मंदिराअगोदर शिर्डीकर द्वारकामाईचे दर्शन घेतात. या ठिकाणीच जवळपास सर्व आरती करतात. मात्र लॉकडाऊननंतर द्वारकामाईचे द्वार अद्याप उघडले नाही. द्वारकामाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांनी साई संस्थानला वारंवार मागणी करूनही खुले करत नसल्याने आता साई संस्थान प्रशासनाने सहनशिलतेचा अंत न पाहता द्वारकामाईचे दरवाजे खुले करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महिला शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.