शिर्डी(अहमदनगर) - साईबाबा मंदिर येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येत आहे. त्या दृष्टीने दिवसाला 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 10 हजार ऑनलाइन आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देऊन दर्शन देणार असल्याचे साई संस्थानने जाहीर केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काही तासाच्या आतच हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यानुसार आता 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन बुकींग करुनच साईदर्शन घेता येणार आहे. तसेच साई संस्थानने प्रसादालय सुरू ठेवण्याचा निर्णयही आता रद्द करण्यात आला आहे.
- साई संस्थानचा तो निर्णय बदलला -
शासनाच्या आदेशानंतर साईमंदिर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासुन सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीने दर्शन मिळेल या निर्णयाची भाविकांना प्रतिक्षा होती. आज सकाळी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पत्रकार परिषद घेत, दिवसभरात 10 हजार भाविकांना ऑनलाइन पासेसद्वारे आणि पाच हजार ऑफलाइन पासेस देत दर्शन देण्याचा निर्णय झाला होता. तसेच एका आरतीला 10 ग्रामस्थ आणि 80 ऑनलाइन पासेस घेतलेल्या भाविकांना उपस्थिती देण्याचा तसेच प्रसादालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
हेही वाचा - शिर्डीचे साई मंदिर सात ऑक्टोबरपासून होणार खुले; तयारीला सुरुवात
साई संस्थानने दर्शनासंबंधीचे नियम जाहीर केल्यानंतर काही वेळ होताच, अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी शिर्डीत येऊन, साईबाबा संस्थान, शनिशिंगणापूर आणि मोहोटा देवीच्या पदाधिकाऱयांसोबत बैठक घेतली आहे. त्यानंतर साई संस्थानने घेतलेल्या दोन नियमांत बदल केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
- दररोज 15 हजार भाविकांना ऑनलाइन मिळणार पासेस -
दररोज 15 हजार भाविकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने पासेस देण्यात येणार आहेत. तसेच साई प्रसादालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. शिर्डीतील व्यावसायिकाना रात्री साडेआठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर रेस्टॉरंटला साडेदहा वाजेपर्यंतच उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. साई दर्शनाला येताना आरटीपीसीआर रिपोर्ट असणे सक्तीचे नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
- शनिशिंगणापुरात थेट मिळणार दर्शन -
शनिशिंगणापुरातही दिवसभरात 20 हजार भाविक थेट जाऊन दर्शन घेऊ शकतील. शनि चौथाऱयावर जाण्यास आणि पूजा साहित्य नेण्यास शिंगणापुरात बंदी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश