शिर्डी (अहमदनगर) - कोरोना पाठोपाठ सारी (सिव्हिअरली अॅक्युट रेस्पारेटरी इलनेस) या आजाराने नगर जिल्ह्यात डोकेवर काढले आहे. आज कोपरगाव तालुक्यातील एका वृद्ध महिलेचा सारी आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
आज पहाटे अहमदनगर शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या एक महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. ही घटना ताजी असतानाच कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा सारी आजाराने मृत्यू झाला.
या घटनेस ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दुजोरा दिला आहे. मृत महिलेला कोरोना संशयित म्हणून १० तारखेला नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ती निगेटिव्ह ठरली होती. तिच्यावर कोपरगावच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. आज तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.
दरम्यान, वृद्धेचा सारी आजाराने मृत्यू झाल्याचे कळताच जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने, मृत महिलेच्या कुटुंबातील ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मृत महिला ज्या गावात राहत होती त्या गावाचा सर्व्हे केला जात आहे.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये अनुयायांशिवाय महामानवाची जयंती ; पुतळ्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त
हेही वाचा - अहमदनगरातील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाचा दूसरा बळी