शिर्डी - भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईचरणी अर्पण केलेल्या दानाच्या रकमेतून साई संस्थानचे अधिकारी बेकायदेशीररित्या विमान प्रवासावर लाखो रुपये खर्च करत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामुळे पदाचा दुरुपयोग करून साई संस्थानच्या तिजोरीला आर्थिक झळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - साई दर्शन पासेस मिळण्याच्या वेळेत बदल; उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता संस्थानचा निर्णय
परवानगी नसतानाही...
शिर्डी साईबाबा संस्थानचा कारभार राज्याच्या विधी व न्याय खात्यांतर्गत चालवला जात असून साईबाबा संस्थानच्या कोणकोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साई संस्थानच्या खर्चाने विमानाने प्रवास केला, याची माहिती कोपरगाव येथील संजय काळे यांनी शासनाकडे मागितली होती. त्यात त्यांना माहिती पुरविताना 3 मार्च 2010चा जीआर उपलब्ध करून दिला आहे. यात सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच विमान प्रवासाची परवानगी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी विश्वस्त आणि कर्मचारी हे त्या दर्जाचे नसतानाही बेकायदेशीरपणे साई संस्थानच्या निधीचा वापर करत सन 2018 ते 2021पर्यंत सहा लाख रुपये खर्च करत तिरुपती, रांची, डेहराडून, दिल्ली आणि मुंबई औरंगाबाद असा प्रवास केला असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - शिर्डीतील प्रकल्पांना सरकारने मान्यता न दिल्यास संस्थानच्या अखर्चित निधीवर आयकराचे संकट....
शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना मुळात असा प्रवास करण्याचा अधिकार नाही. त्यात साई संस्थानकडे चांगल्या दर्ज्याची वाहने असतानाही कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई, शिर्डी आणि विश्वस्तांनी मुंबई, औरंगाबाद प्रवास करून साई भक्तांनी श्रद्धेने चढविलेल्या देणगीतून आपले पर्यटन केल्याचा आरोप काळे यांनी केला. या पैशाची वसुली करुन या व्यक्तींवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.