अहमदनगर : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माणासाठी साई संस्थानकडून कोणत्याही प्रकारे निधी मागण्यात आला नव्हता. त्यामुळे साई संस्थानने निधी नाकारल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा खुलासा विश्व हिंदू परिषदेचे उत्तर नगर जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले यांनी केला आहे. साईबाबा पाठोपाठ साई संस्थानच्या बदनामीचे कारस्थान सुरू आहे. संस्थानने हजला देणगी दिल्याचा व राममंदिराला नाकारल्याचा समाजमाध्यमाद्वारे खोटा प्रचार सुरू असल्याचा खुलासा महाले यांनी केला आहे.
साई संस्थानने निधी नाकारला हा आरोप खोटा : या प्रकरणी बोलताना सुरेंद्र महाले म्हणाले की, 'श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यासाठी देशभरात 15 ते 31 जानेवारी 2021 या काळात निधी संकलन करण्यात आला. विहिंपचा जिल्हा सहमंत्री या नात्याने मी राहाता तालुका तर विशाल कोळपकर शिर्डी शहराचे निधी संकलन प्रमुख होतो. निधी संकलनासाठी शिर्डीकरांबरोबरच साई संस्थानातील पुजारी, कर्मचारी, अधिकारी, माजी विश्वस्तांनीही भरभरून प्रतिसाद दिला.या काळात कोविडमुळे साईमंदिर बंद होते. तसेच संस्थानकडे असा निधी देण्याची तरतूद नसल्याचीही माहिती होती. त्यामुळे विहिंपने साई संस्थानकडे निधीसाठी लेखी वा तोंडी मागणी केली नाही. त्यामुळे संस्थानने निधी नाकारला, हा आरोप धादांत खोटा आहे. विशेष म्हणजे, अयोध्येला श्रीराम मंदिरासाठी पाठविण्यात आलेली श्री साईबाबांच्या गुरुस्थानातील पवित्र माती, तीर्थ व विभूती भूमिपूजनासाठी वापरण्यात आली. काही अपप्रवृत्तीकडून देशविदेशात साई संस्थान व प्रत्यक्ष श्रीसाईबाबांच्या बदनामीचे मोठे कटकारस्थान सुरू असल्याचा संशय महाले यांनी व्यक्त केला आहे.
बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार : साई संस्थानच्या घटनेत असा निधी देण्याची तरतुदच नाही. अशी कोणी मागणीही केलेली नाही. त्यामुळे कुणाला निधी देण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच नाही. या अपप्रचाराबाबत आम्ही बदनामी करणारे तसेच यु-ट्युब, ट्विटर, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव म्हणाले आहेत. साई संस्थानच्या वतीनेही उच्च न्यायालयात वकिलांशी संपर्क करण्यात आला असून लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा : Refinery Protest Ratnagiri: रिफायनरी आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आंदोलन चिघळण्याची शक्यता