अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थान मददतीसाठी आल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी दारूचे दुकाने सुरू झाल्याने दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे असणाऱ्या १०० जणांना स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारे मोफत जेवणाचे डबे बंद करण्यात आले आहेत.
संगमनेर येथील अनेक सामाजिक संघटना मदतीसाठी समोर आल्या आहेत. या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या हाताला काम नसल्याने संगमनेर येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदींसह अन्य संस्थांनी अन्नदान सुरू केले आहे. गरजूंना सुमारे 800 डब्यांचे मोफत जेवण वितरीत करण्यात येत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल दीड महिन्यानंतर मंगळवारी 5 मे रोजी दारूची दुकाने उघडली. शहरातील दुकानांसमोर पहाटेपासून मद्यप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. या दारूच्या रांगेत उभे राहणाऱ्या 100 लाभार्थींचे डबे बंद करण्याचा निर्णय सामाजिक संघटनेने घेतला असल्याचे अमर कतारी यांनी सांगितले.
जे लोक मोफत जेवण घेण्यासाठी रांगेत उभे राहतात त्यातील काही लोक दारू घेण्यासाठी रंगेत उभे होते. त्यांच्याकडे दारू खरेदी करण्यासाठी पैसे आहेत. मग मोफत जेवण का घेतात? गोरगरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने काही मोठ्या लोकांनी दारूखरेदीसाठी तरुणांचा आधार घेतला असून सामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणारे तरुण 100 ते 150 रुपये देऊन रांगेत उभे करण्यात आले असल्याचा आरोप देखील सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला.