शिर्डी : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी विमानाने येणाऱ्या भाविकांना शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. या विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबर 2017 ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय सुविधा कासवगतीने सुरू आहे. मात्र, आता येत्या जूनपासून विमानतळावर नाईट लँडींग सुविधा सुरू होणार असल्याचे एमएटीसीकडून सांगण्यात आले आहे. ( The Night Landing Facility will be Launched )
शिर्डीला येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांसाठी 1 ऑक्टोबर 2017 ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळाचे उद्घाटन करण्यात आले. शिर्डीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर उभारलेल्या या विमानतळास विमान कंपन्या आणि प्रवाशांचा ही चांगला प्रतिसाद मिळू लागला. शिर्डीच्या विमानतळाचे नाव आंतरराष्ट्रीय जरी असले तरी तेथे तशा सुविधा नव्हत्या.
पावसाळ्याच्या दिवसात विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी असल्याने सकाळी आणि संध्याकाळी विमाने उतरण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे विमानतळावर रात्रीचीही विमाने उतरण्यासाठीची यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली. आता ती बसवून पूर्ण झाल्यानंतर नाईट लॅंडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय ची टीम, तपासणी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी येथून लवकरच नाईट लॅंडींग सुविधा सुरू होणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आतापर्यंत 2 लाख किलो मालाची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बेंग्लोर, चेन्नई व दिल्ली येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा अजून व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब बांधण्यात येणार आहे.
हेही वाचा : कार्गो वाहतुकीसाठीही आता शिर्डी विमानतळाला मिळाली परवानगी