अहमदनगर - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी? याबाबत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली.
बालकांसाठी जिल्हा रुग्णालयात 100 आयसीयू
'1 ते 18 या वयोगटातील कोरोना बालरुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 100 आयसीयू खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 25 शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 10 खाटांची सुविधा केली जात आहे. यासाठी खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य तिसऱ्या लाटेत बालरुग्णांना सुविधा देण्यात येणार आहेत', अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी ईटीव्ही भारतला दिली.
बालरुग्णांची आकडेवारी
'एप्रिल आणि मे महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या जास्त होती. त्या तुलनेत बालरुग्ण 8 ते 10 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 बालके दगावली आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत 8 ते 10 टक्के 1 ते 18 वयोगटातील बालरुग्ण ही सामान्य बाब आहे. सर्वत्र हिच परिस्थिती आहे. मात्र, ही आकडेवारी वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित बालकांचे प्रमाण वाढत आहे. तीन महिन्यात १८ हजार बालकांना कोरोना झाला. तर एकट्या मे महिन्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील बाधित मुलांची संख्या ९ हजार ९२८ इतकी आढळली', अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांनी दिली.
हे प्रमाण चिंताजनक
तर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. नगरमध्ये मे महिन्यात एकूण ८० हजार ७८५ नागरिकांना संसर्ग झाला होता. या तुलनेत मुले बाधित होण्याचे प्रमाण प्रमाण ११.६५ टक्के होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
टास्कफोर्स सोबत अधिकाऱ्यांची बैठक
लहान मुलांमधील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्स समिती नेमण्यात आली आहे. या समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बालरोग तज्ज्ञ जिल्हा प्रशासनाच्या मदतीला
टास्कफोर्स बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, की 'सध्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ मोठ्या झपाट्याने झाली. संसर्गाचा वेग जास्त होता. तरुणांबरोबरच काही प्रमाणात मुलांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेत संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन म्हणून आणि आरोग्य यंत्रणा म्हणून आपण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी तयार असले पाहिजे. कोरोनापासून बचावासाठी लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी? याबाबत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे माहिती तयार करावी. तसेच, ग्रामस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविका यांनाही त्या अनुषंगाने प्रशिक्षित करावे'.
शासकीय रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांचा अभाव
'जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञांची पुरेशी संख्या नाही. त्यामुळे भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने पुढाकार घेऊन याकामी प्रशासनाबरोबर हातात हात घालून सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. संभाव्य कोरोना संसर्गाची लाट वेळीच थोपावली आणि त्याबाबतची पूर्वकाळजी घेतली. तर आपण त्याचा यशस्वी सामना करु शकू', असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, 'आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पालक यांनी एकत्र येत काम करावे लागणार आहे. लक्षणे ओळखणे आणि तातडीने तपासणी करून उपचार करणे. 108 क्रमांक अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सुविधा असणे गरजेचे आहे', असे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार, पशुसंवर्धन मंत्र्यांची माहिती