अहमदनगर - नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. करंजगावातील शेतकऱ्यांनी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त केला. तर, राजकीय विरोधातून ही स्टंन्टबाजी केली जात असल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.
कारखाना जाणीपूर्वक त्रास देत आहे -
नेवासा तालुक्यातील करंजगाव येथील अशोक टेमक या शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसाला आग लावली. केवळ राजकीय विरोधक असल्याने मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जातो. अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
हा तर केवळ राजकीय स्टंट -
मुळा सहकारी साखर कारखाना परिसरात 34 लाख टन ऊसाचे क्षेत्र आहे. कारखाना 14 लाख टन ऊसाचे गाळप करू शकतो. ज्या तीस हजार शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊसाच्या नोंदी केल्या आहेत. त्यांच्या ऊसाची अगोदर तोड होणार आहे. एकाचवेळी सगळा ऊस कसा तोडला जावू शकतो. सदर शेतकऱ्याने ऊसाची नोंदही केलेली नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. गडाखांना बदनाम करण्यासाठी हे सुरू असल्याचे कारखान्याचे चेअरमन नाना तूवर यांनी सांगितले.