अहमदनगर - शेतकरी आज संकटात आहे. मात्र, सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे, शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र, तुम्ही धीर सोडू नका; मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. पवार आज बीड जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते काही वेळ कर्जतमध्ये थांबले होते. त्यावेळी दुष्काळाशी सामना करत असलेल्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या असता, त्यांनी सरकारवर निशाण साधत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्यास उशीर होत असताना देखील शेतकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन काही काळ येथे थांबून पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांचे नातू रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दीपक शिंदे, राजेंद्र गुंड, मोहन गोडसे, काका तापकीर, सुरेश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यावेळी दीपक शिंदे यांनी शरद पवार यांना नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा आपण दौरा करावा, अशी विनंती करत सध्या शेतकऱ्यांना जनावरांचा चारा पिण्याचे पाणी यांच्या अडचणी व तक्रारीचा पाढा वाचला. तसेच कर्जत जामखेडमध्ये बारामती ॲग्रो या संस्थेकडून पाण्याचे ८० टॅंकर सुरू असल्यामुळे दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळाल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की ग्रामीण भागामध्ये शेतकरी आज संकटात आहे केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी फारशी मदत आलेली नाही. राज्य सरकारचा जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी यांचे चांगली नियोजन नाही. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मात्र, तुम्ही धीर सोडू नका; आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
रोहित दादांना तिकीट द्या - कार्यकर्त्यांची मागणी
दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी घोषित करावी, अशी मागणी केली. रोहित पवार सध्या मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे सांगत बारामती अॅग्रो मार्फत ८० च्या वर पाण्याचे टँकर सुरू केल्याचे तसेच भूतवडा तलावातील गाळ काढण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्याचे सांगितले. पाण्यासाठी जामखेडमध्ये झालेल्या हाणामारीची माहितीही यावेळी शरद पवार यांनी यावेळी घेतली. त्यावर वादावादी झालेल्या प्रभागात दोन अतिरिक्त टँकरची सुविधा रोहित पवार यांनी केल्याचे त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितले.