अहमदनगर- हिंघणघाट, औरंगाबाद, लातूर, नाशिक येथील जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच राहाता तालुक्यातील एकरुखे येथेही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर पती स्वतः राहाता पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. सुनील लेंडे असे पतीचे नाव आहे.
हेही वाचा- खुशखबर..! कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी होणार जाहीर
सुनील जनार्दन लेंडे याचे पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार भांडण होत होते. दरम्यान, अशाच भांडणात सुनीलने पत्नीला शिवीगाळ करुन हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
सुनीलने पत्नीचा मृतदेह पोत्यात घालून एकरुखे नपावडी रोडला रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारस आणला. तिथे रस्त्याच्याकडेला पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. त्यानंतर थेट राहाता पोलीस ठाण्यात जाऊन त्याने प्रकार सर्व प्रकार सांगितला.
पोलिसांनी सुनीलच्या पत्नीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देत सुनीलला रविवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान घटनास्थळी नेले. तिथे मृतदेह 80 टक्के जळालेल्या अवस्थेत होता. दरम्यान, पोलिसांनी सुनील लेंडेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.