अहमदनगर - अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याजवळ जहागिरदारवाडी गाव वसलेले आहे. येथील महिला आणि ग्रामस्थांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय गावातील विहिरीतील गाळ उपसा केला आहे. गावकऱ्यांनी विहीर स्वच्छ करून शुध्द पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
या गावाला कळसूबाई सारख्या उंच शिखराची साथ लाभली आहे. इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र, गावात सोई सुविधा नाहीत. गावातील विहीरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होते. या उन्हाळ्यातही तोच त्रास जाणवला. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी गावाची विहीर साफ करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे.
यासाठी त्यांनी गावातील काही पुरुषांची मदत घेतली. आणि साध्या पद्धतीने विहिरीतील गाळ उपसा करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी टायरची मोठ केली. व काहींनी बादलीने ओढुन हा गाळ काढला आहे. ग्रामपंचायतीकडून गाळ काढण्यासाठी निधी असतो. मात्र, ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेल्या ७-८ महिन्यांपासून पंचायतीचे दप्तर घेऊन फरार झाला आहे.
त्याने अजूनही ग्रामपंचायतीचे दप्तर अजून जमा केले नाही. नवीन ग्रामसेवक २-३ महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपावर नेमलेले आहेत. मात्र, त्यांच्याकडे दप्तर उपलब्ध नसल्यामुळे ते गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन उदासीन असताना गावातील लोकांनी राबवलेली ही खरी 'गाळ मुक्त' मोहीम म्हणावी लागेल.