अहमदनगर - 'मेरे देश मे मेरा अपना घर' आंदोलनाच्या पुढाकाराने नगरच्या हुतात्मा स्मारकात समाजसेवक आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधुन देशातील वंचितांना घरे मिळवून देण्यासाठी 'मोदी गुंठा' सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घरकुल वंचितांबाबत अन्याय केला. स्वतःचे घर भरण्यासाठी मेहतांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पूर्वीही 'मेरे देश मे मेरा अपना घर' आंदोलनाने मेहता यांना राष्ट्रीय पांढरा हत्ती गॅझेट प्रसिद्ध करून मंत्री मंडळातून डिच्चू देण्याची मागणी केली होती. मंत्री मंडळातून अखेर मेहता यांना डिच्चू दिल्यामुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त केला आहे.
देशातील ग्रामीण भाग आणि मध्यम शहरांमधील घरकुल वंचितांना प्रत्यक्ष घरे बांधून देणे केंद्र किंवा राज्य सरकारच्या आवाक्या बाहेरचे आहे, त्यामुळे हायब्रिड लॅन्ड पलिंगच्या माध्यमातून प्रत्येक घरकुल वंचिताला ६० ते ७० चौ.मी. क्षेत्रफळाचा भुमिगुंठा देण्याची भुमिका आंदोलनाने मांडली. त्यासाठी राष्ट्रव्यापी 'मोदी गुंठा' आंदोलन जारी करण्यात आले. या संदर्भातील माहिती पंतप्रधान मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातील गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी यांना पाठविण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षापेक्षा जास्त काळ मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन सुरू आहे.