अहमदनगर - शासनाकडून पोषण अभियन कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याने त्याचा वापर करताना सेविकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे राहाता तालुक्यातील तब्बल सहाशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत शासनाला मोबाईल परत करून 'मोबाईल वापसी' आंदोलन केले आहे.
शासनाकडून सन 2019 मध्ये सेविकांना देण्यात आलेल्या या मोबाईलची वॉरंटी मे, 2021 मध्येच संपली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 17 ऑगस्टपासून आपापल्या प्रकल्प कार्यालयात जावून मोबाईल परत करण्याचे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यासाठी करतात. मात्र, मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने ते वारंवार हँग होतात. लवकर गरम होतात, त्यामुळे या मोबाईलवर सेविकांना काम करणे कठीण होते. या मोबाईलचा दर्जा निकृष्ट असल्याने दुरूस्तीचा खर्च सुमारे 3 ते 8 हजारापर्यंत होतो. शासन मोबाईल दुरूस्तीचा खर्च सेविकांकडूनच वसूल करते. निकृष्ट दर्जामुळे सध्या सेविकांकडील हजारो मोबाईल बिघडले आहेत. 3 हजारांपेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले असून जो पर्यत चांगल्या दर्जाचे मोबाईल शासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी अंगणवाडी सेविका म्हणाल्या आहे.
या आहेत मागण्या
- अंगणवाडीच्या कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो व त्याच्या दुरुस्तीसाठी ते 4 हजार रुपयांचा तर काही ठिकाणी आठ हजारांपर्यंत खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो, तरी हा प्रकार आपण ताबडतोब थांबवावा. शासनाने दिलेले हे सर्व जुने मोबाईल परत घ्या व नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाईल द्या.
- केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ऍप हा सदोष असून तो सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅम व रोम कमी
असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही. त्यामुळे त्यासाठी सेविकांना आपल्या खासगी वैयक्तिक मोबाईलमध्ये तो डाऊनलोड करावा लागला आहे. इंग्रजी न येणाऱ्या
अनेक कर्मचाऱ्यांना त्यात वयस्थांच्या मदती शिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे एकदाच करण्याचे नाही तर दैनंदिन काम आहे. ते रोज अशा त्रयस्थ
व्यक्तीकडून करवून घेणे अशक्य आहे. शिवाय या ऍपमध्ये असलेल्या, डिलिटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यावयाच्या सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन न देणे, भरण्याची पद्धत अतिशय किचकट असणे अशा त्रुटीमुळे कामात मदत होण्याऐवजी उलट ओझे वाढले आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे योग्य नाही तरी एकतर तो ऍप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर करा अन्यथा तो ऍप रद्द करा. - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मूळ काम लाभार्थ्यांना सहा सेवा देणे हे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ऍपमध्ये माहिती पाठवण्यात अडचणीमुळे कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना देण्यात येणान्या पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक ठरेल. तरी मानधन किंवा आहार कोणत्याही ऍपला जोडू नये व त्या दोन्हीत कोणत्याही प्रकारची कपात करू नये.
- मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा रुपये 500 व 250 प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. सेविका काम करत असूनही त्यांना योग्य रक्कम मिळत नाही. पण, त्यांच्या मदतनिसांना मिळते, अशी देखील उदाहरणे आहेत. तरी त्यात सुधारणा करा. मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्त्यात किमान एक हजारांपर्यंत वाढ करा.
- मोबाईलवरील काम वाढल्यापासून सेविकांचे पद रिक्त असलेल्या अंगणवाडीची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणे सेविकांना अशक्य झाले आहे. तरी अशी अतिरिक्त जबाबदारी कुणावरही लादण्यात येऊ नये. रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी.
हेही वाचा - तहसीलदार देवरेंच्या आवाजातील आत्महत्येच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल