अहमदनगर - जावई आघाडीचे उमेदवार असले तरी सुजय विखेंना निवडून आणायची जबाबदारी मी घेतली आहे, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. ते आज नगरमध्ये युतीच्या समन्वय बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
नगर दक्षिणेत भाजपच्या तिकीटावर सुजय विखेंनी लढावे, असा आग्रह सर्वप्रथम मी केला होता. मी त्यांना आणि पक्षाला ही जागा निवडून आणण्याचा शब्द दिलेला आहे. त्यामुळे आघाडीकडून जरी माझे जावई आमदार संग्राम जगताप हे उमेदवार असले तरी मी युतीचे उमेदवार सुजय यांचेच काम करणार आहे. विखेंना निवडूण आणण्याची जबाबदारी माझी असेल, असे मत भाजप आमदार आणि संग्राम यांचे सासरे कर्डिले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर कर्डिले काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जावई म्हणून कर्डिले जगताप यांनाच मदत करतील, अशी चर्चा सामान्य नागरिकांत आणि राजकीय विश्लेषकांमध्ये होती. मात्र, कर्डिले यांनी आज युतीच्या समन्वय बैठकीनंतर आपण युतीचे उमेदवार सुजय विखे यांचेच काम करू, तसेच देशात सर्वाधिक मताधिक्याने त्यांना निवडून आणू, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
विखे परिवाराशी आपले जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक अडचणीच्या काळात त्यांची मदत झाल्याचे कर्डिले यांनी मान्य केले. आपण निसंदिग्धपणे विखे यांना निवडून आणण्याची जबादारी घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माझे जावई जगताप जरी आघाडीचे उमेदवार असले तरी कौटुंबिक नाते संबंध एकीकडे असतात आणि राजकीय भूमिका एकीकडे असते, त्यामुळे मी युतीचे काम करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.