अहमदनगर sugarcane workers : जिल्ह्यातील नेवासा येथे ऊसतोडणी करिता इगतपुरी तालुक्यातून आदिवासी समाजातील 21 मजुरांना 2 हजार रुपयांची उचल देवून आणण्यात आलं होतं. नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील ठेकेदार पंकज खाटीक यांनी या मजुरांना 1 महिनाभर काम करून घेतल्यानंतर कोणताही मोहबदला न दिल्याने, पीडित मजूर घरी जाण्यासाठी निघाले होते. ठेकेदार खाटीक याने मजुरांना दमदाटी आणि मारहाण करून त्यांना डांबून ठेवलं होतं. यासंदर्भातील माहिती श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांना कळताच त्यांनी डांबून ठेवलेल्या मजुरांना घेऊन नेवासा पोलीस ठाणे (Newasa Police Station) गाठले. त्यावेळी मजुरांची तक्रार घेण्याऐवजी पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी मजुरांनाच दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची माहिती, श्रमजीवी संघटनेचे गोकुळ हेलम यांनी दिली.
ठेकेदार आरोपी पंकज खाटीक अटक : संघटनेच्या पदाधिका-यांनी घडलेला सर्व प्रकार विधानसभेचे आमदार कपिल पाटील यांना सांगितला. विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात पाटील यांनी, आदिवासी समाजातील मजुरांच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडत ठेकेदार पंकज खाटीक याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षक डोईफोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. नेवासा पोलीस ठाण्यात मजुरांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 374, बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18 यासह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील ठेकेदार आरोपी पंकज खाटीक याला अटक करण्यात आली असून मजुरांची सुटका करण्यात आलीय.
पोलिसांची निष्क्रियता सिध्द झाल्यास कारवाई : या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितलं की, याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. जर यात पोलिसांची निष्क्रियता सिध्द होत असेल, तसेच त्यांच्या बेजबाबदारपणामुळे गुन्हेगारांना संरक्षण मिळत असेल तर निश्चितपणे निलंबनाच्या सूचना देण्यात येतील.
हेही वाचा -