अहमदनगर : दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास मदत होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल. त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe ) यांनी सांगितले.
सेंटर फॉर एक्सलन्स केंद्राची निर्मीती - हिमाचल प्रदेशातील सेंटर फॉर एक्सलन्सच्या धर्तीवर हे केंद्र असेल. या केंद्राच्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीने करावयाचा दुग्ध व्यवसाय, जनावरांच्या जातींमधील सुधारणा, दुग्ध शास्त्रावर आधारित अभ्यासक्रम, दुग्ध व्यवसायावर आधारित प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्रांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. या केंद्राच्या जागा निश्चितीसाठी डेन्मार्कचे शिष्टमंडळ लवकरच भेट देऊन जागेची पाहणी करणार आहे. याशिवाय बैठकीत हरति ऊर्जा, दुग्ध व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी, शिक्षण यावर चर्चा होवून परस्पर सहकार्यावर चर्चा झाली. प्रधान सचिव गुप्ता यांनी महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती दिली.
![Radhakrishna Vikhe Patil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shirdiradhakrishnavikhepatil_22112022164326_2211f_1669115606_438.jpg)
केंद्रामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना लाभ - मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, या केंद्रामुळे पशुपालकांसह शेतकऱ्यांना लाभच होईल. त्यासाठी केंद्राची जागा निश्चित करावी. त्यासाठीचा प्रकल्प अहवाल तातडीने तयार करावा. तसेच डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने केंद्रासाठी जागेची पाहणी करावी, असेही सांगितले. डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांच्या नेतृत्वाखाली मंत्री विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, 'महानंदा'चे व्यवस्थपकीय संचालक एस. आर. शिपूरकर आदी उपस्थित होते.