अहमदनगर - राज्यात सरकार स्थापन झाले आहे. हिवाळी अधिवेशन येत्या 16 तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे खातेवाटप आज किंवा उद्याच होईल, अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत दिली.
हेही वाचा - बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज (शनिवार) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत साई मंदिरात दर्शन घेतले. राज्यातील मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल तिन्ही पक्षात कोणतेही मतभेद नाहीत किंवा नाराजी नाही. खातेवाटप आज किंवा उद्याच होणार आहे. आपल्याला जनतेचे कामं करायची आहेत. त्यामुळे कोणतेही खाते आले तरी कामे करता येतात, हे सगळ्यांनाच माहीत असल्याचेही थोरातांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत मागील 9 वर्षात शून्य एन्काऊंटर; 'या' गँगच्या गुंडाचा केला होता शेवटचा खात्मा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी अनेक लोकं पक्ष सोडून गेलीत. आता त्यांनाही पश्चाताप होत आहे. काहींना पुन्हा पक्षात यावेसे वाटते. मात्र, अडचणीच्या काळात जे सोडून गेलेत त्यानंतर त्यांची जागा तरुणांनी घेतली. या तरुणांनी चांगले काम केले व अनेक ठिकाणी ते निवडूनही आले. मात्र, आता पुन्हा त्या लोकांना पक्षात घ्यायचे की नाही, हे या तरुणांना आधी विचारावे लागेल. त्यांनी जर होकार दिला तर पुन्हा पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात घेऊ. मात्र, आम्ही कोणाचीही मनधरणी करायला जाणार नसल्याचेही थोरातांनी स्पष्ट केले.
राज्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडाळाची निवड आणि इतरही महामंडळांची निवड मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच केली जाईल, असेही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.