अहमदनगर - महाविकास आघाडी सरकारमधील सबंध हे दुधातील साखरेच्या गोडीसारखे असुन वातावरणही विश्वासाचे असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मनात काही नसते. पोटात काही राहात नाही. तसेच चुकीचेही काही नसते. महाविकास आघाडीत खेळीमेळीचे वातावरण असल्याच ठाकरे यांनी म्हटले. ते आज संगमनेर येथे आयोजित दंडकारण्य अभियानाच्या सांगता सोहळ्यात बोलत होते.
'बेस्ट ऑफ इलेव्हन'सारखे आमचे काम -
गेल्या 16 वर्षांपासून संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात वृक्षारोपण करत दंडकारण्य अभियान राबविले जात आहे. आज यावर्षीच्या दंडकारण्य अभियानाचा सांगता सोहळा पार पडला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांमध्ये आधीही चांगले सबंध होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासुन तर आम्ही सरकार मध्ये एकत्र आलो आहे. अनेकांना तीन पक्षांचे सरकार होत असतांना शंका होत्या. मात्र, तिन्ही पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत सरकार चांगल चालवले आहे. शिवसेना हा शहरी पक्ष तर दोन्ही काँग्रेस ग्रामीण पक्ष समजले जायचे. मात्र, आता शहरी आणि ग्रामीण आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रातील कोणाताही भाग आम्ही वंचित ठेवणार नसल्याचे सांगत क्रिकेटचा संघ निवडताना बेस्ट ऑफ इलेव्हन सारखे आमचे काम चालले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
...म्हणुन काही लोक देव पाण्यात घालुन बसलेय -
तुम्हाला पुढे राज्यात नेतृत्त्व करायचे असेल तर ग्रामीण भागातील सगळ्यांची ओळख हवी. त्यासाठी महाराष्ट्रात फिरा, असा सल्ला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरेंना दिला. आमचे सरकार चालवण्यामध्ये उध्दवजींच्या स्वभावातील व्यक्तिमत्त्व कारणीभुत आहे. काही लोक महाविकास आघाडी सरकार जावे म्हणुन देव पाण्यात घालुन बसले आहेत. काही तर स्वप्नात सुधा बडबडत असतील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मात्र, आमचे सरकार पुढचे तीनही वर्ष व्यवस्थित चालणार असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा - आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही तर 26 दिवस कोठडीत का ठेवलं; सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल
आई जेवू देईना आणि बाप भीक मागू द्यायना अशी माझी अवस्था -
यावर्षी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने दंडकारण्य सोहळ्याला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अनेक गुपित उघड करत 2014ला बाळासाहेब थोरात यांनी मला निवडणुकीत मदत केल्याचा गौफ्यस्फोट भाषणातून केला. तर 2019ला विखेंच्या मदतीने खासदार झाल्याने आज आई जेवू देईना आणि बाप भीक मागू द्यायना, अशी माझी अवस्था झाली, असे वक्तव्य केल्यानंतर सभेत एकच हश्या सुरू झाला.