अहमदनगर- मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी (MIM On Muslim Reservation) आज मुंबईमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (MIM President Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे. या सभेसाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) अनेक वाहनांच्या ताफ्यासह मुंबईतील सभेसाठी औरंगाबादेतून रवाना झाले असून, त्यांच्या वाहनांचा ताफा अहमदनगर जिल्ह्यातून पुढे पुणे जिल्ह्याकडे रवाना झाला (MIM Rally Leaves Ahmednagar) आहे.
बायपास रोडने रॅली शहराबाहेर
या सभेला राज्य सरकारने आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही आजची सभा होणारच, असं एमआयएमकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताफ्याला नगर शहरात येऊ न देता शेंडी गावातून रिंगरोड बायपासने नगर शहराच्या बाहेरून जाऊ दिले. नगर शहरालगत शेंडी, मनमाड रोड, कल्याण रोडला छेडत जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याने त्यांना पुणे मार्गावर जाऊ देण्यात आले. नगरच्या हद्दीत खा. जलील यांच्या ताफ्याला काहीवेळ पोलिसांनी थांबवले होते. मात्र नंतर पोलीस प्रशासनाने हा ताफा नगरकडे येऊ दिला. नगर शहरात या ताफ्याला न येऊ देता बाह्यवळण रस्त्याने ताफ्याला पुण्याकडे जाण्यास रस्ता मोकळा करून दिला. मिळालेल्या माहितीनुसार पुढे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथून हा ताफा चाकणमार्गे तळेगाव दाभाडेकडून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. ताफ्याला पुण्यात जाऊ न देता चाकणमार्गे पुढे रवाना केले जाणार असले तरी, पुढे मुंबई हद्दीत प्रशासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.
नगर शहरात कडेकोट बंदोबस्त
या पार्श्वभूमीवर नगर शहरात पोलिसांनी विविध चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात आहेत. शहरात अचानक एव्हढा मोठा पोलीस बंदोबस्त दिसल्याने सामान्य नागरिक चौकशी करत होते.