अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील दैवकोठे येथील शेतकरी अशोक सांगळे यांनी एक अनोखे तंत्र विकसीत केले आहे. दूध काढण्यासाठी न परवडणारे दूध काढणी यंत्र आणि परिसरात असलेली वीजेची समस्या, यावर तोड म्हणून शेतकरी सांगळे यांनी भन्नाट जुगाड जमवले आहे. अशोक सांगळे यांनी ट्रक्टरच्या एअर क्लिनरच्या सहाय्याने दूध काढण्याचे तंत्र विकसीत केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी शेती व्यवसायला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायकडे वळाले आहेत. आज प्रत्येक शेतकऱ्याकडे चार ते पाच गाय आहेत. त्यामुळे कमी वेळात गायीचे दूध कसे काढता येईल, हा विचार प्रत्येक शेतकरी करत असतो. दुग्धव्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीपूरक व्यवसाय आहे. मजुरांचा तुटवडा हा या व्यवसायाचा नेहमीचा प्रश्न असतो. मात्र, सध्या यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय तेजीत आहे. परंतु, लहान शेतकऱ्यांना दूध काढण्याची यंत्रे घेणे परवडत नाहीत आणि विजेची समस्याही त्यांना सतत भेडसावत असते.
हेही वाचा - यंदा राजधानीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात बदल; कोरोना योद्धे वाढवणार कार्यक्रमाची शोभा
संगमनेर तालुक्यातील दैवकोठे येथील अशोक सांगळे या शेतकऱ्याने गेल्या काही दिवसांपूर्वी गायीचे दूध काढण्यासाठी नवीन मिल्किंग मशिन खरेदी केले होते. या मशीनला लाईट आणि जनरेटर पाहिजे असते. मात्र, ग्रामीण भाग म्हटले की, वीजेची मोठी अडचण येते. तसेच जनरेटर मशीन खरेदी करायचे म्हटले की, त्याला किमान 16 ते 17 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अशोक सांगळे यांनी नवीन शक्कल लढवत आपल्याकडे असलेल्या ट्रकटरच्या एअर क्लिनर यंत्राचाच आधार घेत एक पाईप तसेच दोन नळ खरेदी करत त्याला मिल्किंग मशिन जोडले.
या तंत्राचा वापर करुन त्यांनी गायीचे दूध काढण्यास सुरुवात केली आहे. या मशीनला ना लाईटची गरज, ना जनरेटरची गरज आहे. त्यामुळे अल्प आणि कमी दरात आणि कमी वेळात गायीचे दूध काढण्यासाठी याचा फायदा होत आहे. आज तालुक्यातील शेतकरी देखील या सांगळे यांनी बनवलेले मशीनची पाहणी करत असून कौतुक करत आहेत. या मशीनमूळे गायीचे दूध काढण्यासाठी वेळ आणि जनरेटरला लागणारा खर्च कमी झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर करण्याचा सल्ला अशोक सांगळे देत आहेत.
हेही वाचा - रेवा सोलार आशियातील सर्वात मोठा प्रकल्प नाही; पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटला राहुल गांधींचं उत्तर