शिर्डी (अहमदनगर) Ramdas Kadam On Matoshree: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मातोश्रीवर राहून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर संघर्ष केला. ज्या दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना मी बंद करेल, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं; मात्र त्याच्या मुलानं राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर जात बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचं काम केलं. आता मातोश्री ही बाळासाहेब ठाकरे यांची राहिली नसून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मातोश्री झाली असल्याची जोरदार टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिर्डीत केलीय. भाजपाने मातोश्री हे साहेबांचं स्मारक करा, अशी मागणी केली असली तरी ती मातोश्री साहेबांचं स्मारक होऊ शकत नाही, असंही मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. (Ramdas Kadam visit Shirdi)
संजय राऊत हे शकुणी मामा: बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोंधळ घालणाऱ्या गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर आहे. 2024 ला पिक्चर दाखवणार असं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलयं. त्यावर बोलताना रामदास कदम यांनी संजय राऊत हा महाराष्ट्रातील शकुणी मामा आहे. त्याच बोलणं कोणी गांभीर्यानं घेत नाही आणि मी ही त्याला महत्त्व देत नाही. आज त्याचं नाव घेणंसुध्दा उचित ठरणार नसल्याचं कदम यावेळी म्हणाले. गजानन कीर्तीकरांसोबतचा वाद संपला आहे. त्यावर काही बोलणार नाही, असं सांगत किर्तीकरांवर बोलणं यावेळी कदम यांनी टाळलयं.
मराठा आरक्षणासाठी प्रार्थना: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या दुपारच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात "ई टीव्ही भारतशी" बोलताना कदम म्हणाले की, साईबाबांकडे मराठा समाजाला लवकर आणि टिकणारं आरक्षण मिळू दे, ही प्रार्थना केली आहे. एखादा समाज मागास असेल तर अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येईल, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे मीही सरकारला विनंती केली आहे की, मराठा समाज मागास असल्याचं तातडीनं सर्वेक्षण करावं. तो रिपोर्ट आल्यावर सुप्रीम कोर्टात सादर केल्यास ओबीसी आणि मराठामध्ये सुरू असलेला वाद थांबेल आणि पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येईल.
हेही वाचा: