शिर्डी (अहमदनगर) - कोरोना काळात सरकारने सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास प्राधान्य दिले होते. मात्र लस घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याने अनेक नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना लस घेण्यापासून वंचित राहवे लागत असल्याे समोर आल्याने आता ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना लस दिली जाणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र आद्यपही याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झालेली नसल्याचे शिर्डीत पाहायला मिळत आहे.
सरकारने लसीकारण मोहीम सुरू केल्यानंतर सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले. मात्र शिर्डीतील द्वारकामाई आश्रमात मुळातच घरातून काढून दिलेले नागरिक तसेच ज्यांना कोणी नाही, असे ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. यातील अनेक नागरिकांकडे आपले ओळखपत्र देखील नाही. मात्र लस घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याने या आश्रमातील तब्बल 40 लोकांना लसीकारणापासून वंचित रहावे लागले आहे. तर 90 लोकांनी पहिला आणि आता दूसराही डोस घेतला आहे. मात्र आता राहिलेल्या 40 लोकांकडे आपले कुठलेही ओळखपत्र नसल्याने यांना डोस कसा मिळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता सरकारनेही ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना लस दिली जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर आश्रमाचे संस्थपक श्रीनिवास यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र श्रीनिवास यांना स्थानिक प्रशासनाकडून अजून थांबा म्हणून सांगितले जात आहे. यामुळे सरकारने जरी ज्या ज्येष्ठ नागरिकाकडे ओळखपत्र नाही त्यांना लस देण्याची घोषणा केली असली तर मात्र याची स्थानिक पातळीवर कुठलीही अंमलबजावणी झालेली नसल्याचे पाहायला मिळत आहे.
दक्षिणेतील विजयवाडा येथील रहिवासी असलेले श्रीनिवास हे गेल्या 20 वर्षापासून शिर्डीतील कनकुरी येथे द्वारकामाई वृद्ध आश्रम चालवत आहेत. या आश्रमात तब्बल 137 वृद्ध नागरिक आहेत. यातील बरचसे नागरिक असे आहेत, की त्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काडून दिले आहे. तसेच काहींना कोणीच नाही. अशा नागरिकांचा संभाळ श्रीनिवास आणि त्यांचा पत्नी करत आहेत. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत या आश्रमातील तब्बल 37 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 34 जण बरे झाले असून 3 जणांचा यात मृत्यूही झाला आहे. कोरोनाची दूसरी लाट रोखण्यासाठी श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नीने अनेक उपाययोजना केल्या आणि दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नाही. त्याचबरोबर तिसरी लाट रोखण्यासाठीही श्रीनिवास आणि त्यांच्या आश्रमातील कर्मचारी सज्ज झाले असून काम करणारे कर्मचाऱ्यांची आश्रमातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आश्रमातील कुठल्याही नागरिकाला बाहेर जाऊ दिले जात नाही. यामुळे दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाटही रोखण्यात यश मिळणार असल्याचे श्रीनिवास सांगत आहेत.
विजयवाडा येथील श्रीनिवास यांनी 20 वर्षापूर्वी शिर्डीत साईबाबांच्या मंदिरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कनकुरी गावाजवळ द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केला आहे. मूल असून अनाथ असलेल्या माता पित्यांना वाऱ्यावर सोडणारे कमी नाहीत. या वृद्धाश्रमात शेकडो वृद्ध , अपंग राहतात. पोटाला चिमटे घेऊन लहानाचे मोठे करणाऱ्या आईवडिलांना उतरत्या वयात कशा यातना मिळतात, हे या वृद्धाश्रमात आल्यावर समजते. आज या वृद्धाश्रमात, देशातील अनेक राज्यातील तब्बल 130 वृद्ध, अपंग व अनाथ राहत आहेत.
या आश्रमाचे संस्थापक श्रीनिवास हे मूळचे विजयवाडा येथील रहिवासी आहेत. मात्र शिर्डी साईबाबांचे परमभक्त असल्याने त्यांनी साईबाबांची सेवा म्हणून हैद्राबाद येथील एका साई मंदिरात साई सेवा करत होते. त्यावेळी अनेक वृद्ध भक्त मंदिरात येत होते. त्यातील काही भक्त घरात सर्व काही असताना मुले सांभाळ करत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे श्रीनिवास यांच्या लक्षात आले आणि काही भाविकही त्यांना म्हणाले की, साईबाबांच्या दर्शनाबरोबर कुठे एक अनाथ आश्रम असेल तर बरं होईल. म्हणून श्रीनिवास यांनी हैद्राबाद येथील काही लोकांचे एक ट्रस्ट स्थापन केले आणि एक वृद्धाश्रम स्थापन करण्याचे ठरवले आणि या ट्रस्टचे अध्यक्ष पद श्रीनिवास यांनी घेत साईबाबांच्या शिर्डीत एक द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केले आहे.
द्वारकामाई वृद्धाश्रमातील या 130 वृद्ध , अपंग अनाथ लोकांचा संभाळ कशा पद्धतीने श्रीनिवास रेड्डी करत आहेत पाहूया..
सकाळी 7 वाजता आश्रमातील साई ध्यान मंदिरात साईबाबांचे काही तास ध्यान केले जाते. त्यानंतर सकाळी 8 वाजता सर्वाना नाष्टा आणि चहा दिला जातो. त्यानंतर दुपारी 12 वाजता जेवण. यानंतर आश्रमात सर्व भाषिक अनाथ असल्याने सर्वाना सिनेमा हॉलमध्ये हिंदी आणि मराठी, तेलुगू चित्रपट दाखवला जातो. सर्वाना विश्रांतीसाठी आपल्या हॉलमध्ये नेऊन सोडले जाते. पुन्हा दुपारी 4 वाजता सर्वाना चहा आणि नाष्टा दिला जातो आणि सांयकाळी 6 वाजता ध्यान मंदिरात साईबाबांची आरती होते. पुन्हा सर्वाना रात्री 8 वाजेपर्यंत चित्रपट हॉलमध्ये चित्रपट दाखवला जातो. त्यानंतर सर्वांना जेवण दिले जाते. सर्वांचे जेवण झाल्यानंतर या सर्वांचे डॉक्टरकडून चेकअप केले जाते. अशा पध्दतीने या सर्व वृद्ध, अपंग अनाथांची सेवा श्रीनिवास करत आहेत. श्रीनिवास करत असलेल्या कार्याबद्दल कधीही प्रसारमाध्यमांसमोर मांडत नाहीत. कारण ही सगळी सेवा साईबाबा माझ्याकडुन करून घेत आहेत, यात माझे काही नाही. बाबा जे सांगतात तेच मी करत असल्याचे यावेळी श्रीनिवास यांनी सांगितले आहे.
मुले असून अनाथ असलेल्या माता पित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या माता पित्यांना आता श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी यांच्या रूपात मुलगा आणि सुनबाई भेटली आहे. ज्यांना लहानचे मोठे केले त्यांनी वाऱ्यावर सोडले आणि ज्यांच्याशी काही संबध नसलेल्या श्रीनिवास आम्हाला मुलांपेक्षा चांगले सांभाळत असल्याची भावना यावेळी अनाथांनी व्यक्त केली आहे. असे वाटत ही नाही की, आम्ही अनाथ आहे. कधी कोणाची आठवण पण येत नाही कारण, श्रीनिवास आमची एवढी काळजी घेतात की कधी घरच्यांची आठवण येत नाही आणि आज या आश्रमात आम्हाला मुले, मुली, मित्र मैत्रिणी सर्व भेटले असून हाच आमचा परिवार असल्याची भावना यावेळी या अनाथांनी व्यक्त केली आहे.
शिर्डीत असलेल्या द्वारकामाई वृद्धाश्रम अतिशय सुंदर आणि चांगलं पद्धतीने चालवत आहे, मात्र हे सगळे चालते ते सर्व देणगी दारांच्या जीवावर मात्र आजही अनेक लोकांना सांभाळण्याची इच्छा आहे. या पेक्षाही मोठे वृद्धाश्रम बनवण्याची इच्छा श्रीनिवास यांची आहे. मात्र हे सगळे करण्यासाठी गरज आहे आपल्या मदतीची. यामुळे दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन या वृद्धाश्रमाला मदत करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.