अहमदनगर (शिर्डी) : Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात संवाद यात्रा (Jarange Patil Sanwaad Yatra) करत आहेत. रविवारी ही संवाद यात्रा राहुरी आणि राहाता येथे होती. यात्रेदरम्यान जरांगे पाटील यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय.
सरकारला सदबुद्धी द्यावी : साई दर्शनानंतर जरांगे पाटील यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केलीय. मराठा समाजाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची सदबुद्धी साईबाबांनी सरकारला द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी साईबाबांच्या चरणी केली. त्याचबरोबर शेतकरी दुष्काळानं होरपळून निघत आहे. त्यांनाही सरकारनं मदत करण्याची सदबुद्धी साईबाबांनी या सरकारला द्यावी, (Manoj Jarange Patil On Goverment) अशी प्रार्थनाही जरांगे पाटील यांनी साई चरणी केली.
...म्हणूनच चाळीस दिवसांचा वेळ दिला : साईबाबांचा मूळ महामंत्र 'श्रद्धा, सबुरी' आहे. आमच्याकडं सबुरी आहे म्हणूनच सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिलाय. सबुरी आहे म्हणून शांततेत आंदोलन सुरू आहे आणि शांततेत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. साईंच्या दरबारातून ओबीसी नेत्यांना एकच सल्ला देतो, आपल्यातील जातीय सलोखा असाच राहू द्या. भेदभाव कमी ठेवा, तुमच्या विषयी आम्ही कधी भेदभाव ठेवला नाही, तुम्हाला आमच्या वंशजांनी मनापासून साथ दिली होती. साईंच्या पावनभूमीतून तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका, अशी विनंती जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना केली.
जरांगे पाटलांचं राज्य सरकारला आव्हान : मी टीका करण्यासाठी, विरोध करण्यासाठी आंदोलन करत नाहीये. मी त्यातील नसून, मला डाव- प्रतिडाव करता येत नाही. मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणी बोललं तर मी त्यांना सोडत नाही. आम्ही तुमच्या विरोधात बोललो नाही. नेतेमंडळी मराठा आरक्षणाला विरोध करुन रोष का पत्कारुन घेत आहेत? केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळं जातीनिहाय जनगणना करा आणि होऊ द्या 'दूध का दूध, पाणी का पाणी', असं आव्हान जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलंय.
हेही वाचा -