अहमदनगर- दरवर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय 'स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. 'थिंक ग्लोबल फाऊंडेशन'च्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हा पुरस्कार अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून मकरंद अनासपुरे यांना रु. ५१०००, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी पासून फाऊंडेशनने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार अधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गायकवाड आणि सोळंकी या दोन सनदी अधिकाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हेही वाचा -...म्हणून 'दोन स्पेशल' कार्यक्रमात सचिन पिळगावकरांना अश्रु अनावर
आजवर या पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अनासपुरे यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कुणाचाही वरदहस्त नसताना त्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. 'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांचे आधारवड म्हणून उभे राहिले. अनासपुरेंची ही सामाजिक संवेदनशीलता दखलपात्र आहे. त्यामुळेच त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दुसरे पुरस्कार्थी राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड यांनी शासनाच्या वतीने घरपोच धान्य योजना सुरु केली. नाशिकमध्ये ती यशस्वीपणे राबविली. महाराष्ट्र शासनाने या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत सबंध राज्यात या योजनेची अंमलबजावणी केली. राज्यातील अनेक महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी कायदे विषयक प्रशिक्षण दिले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी सांगली ब्रँडिंगचा यशस्वी प्रयोग केला होता. त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे राज्यातील लाखो लोकांना फायदा झाला असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती
तिसरे पुरस्कार्थी विशाल सोळंकी हे अत्यंत कमी वयात भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले गेलेले अधिकारी आहेत. मूळ आसाम केडरचे असणारे सोळंकी सध्या महाराष्ट्रात प्रती नियुक्तीवर आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त असणारे सोळंकी सध्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या सुमारे अडीच कोटीहून अधिक विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी हिरीरीने काम करीत आहेत. त्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयाचे पदवीधर असणारे सोळंकी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रोल मॉडेल म्हणून लोकप्रिय असल्याचे काळे यांनी बोलताना सांगितले.
लवकरच भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते तीनही पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -स्वतःचा जीव धोक्यात घालून किंग जे.डी. ने शूट केलं नवं रॅप साँग