अहमदनगर : डिजिटल सिस्टीमचे एक्स-रे मशिन शिर्डी परिसरात प्रथमच उपलब्ध झाले आहे. या मशिनमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना सुलभता येणार आहे. रुग्ण भरती असलेल्या वार्डात विभागात मशिन नेवुन तेथेच एक्स रे काढता येणार आहे. त्यामुळे रुग्णांना तात्काळ रिपोर्ट मिळुन डॉक्टरांना लगेच त्यांचेवर उपचार करता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणेस सोईचे होणार आहे. सदर डिजिटल सिस्टीममुळे रेडिएशन एक्सपोजरचे प्रमाणही कमी होणार आहे. रेडिएशनमुळे रुग्णांवर होणारा अपाय कमी होण्यासही मदत होणार आहे.
सेवाभाव ठेवुन काम करावे : साईबाबा संस्थानच्या वतीने चालवण्यात येणारे श्री साईनाथ आणि श्री साईबाबा या दोन्ही रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकरीता सहज व सोप्या पद्धतीने उपचार पद्धती राबविता यावी, याकरीता मी स्वत: प्रयत्न करणार आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांनी 'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा' हा सेवाभाव ठेवुन काम करावे, असे आवाहन संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
रिपोर्ट स्पष्ट व चांगल्या प्रतीचे : या मशिनमुळे रुग्णाचे रिपोर्ट स्पष्ट व चांगल्या प्रतीचे होणार आहे. तसेच यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता जास्त मदत होणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, श्री साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, महिंद्रा फाऊंडेशनचे पदाधिकारी, बायोमेडीकल विभागाचे इंजिनिअर यांचेसह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचारक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
याआधी साईचरणी समर्पित केलेले दान : 31 जानेवारी रोजी हैद्राबाद येथील साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ 233 ग्रॅम वजनाचे 12 लाख 17 हजार 425 रुपये किंमतीचे सुवर्ण कमळ साईबाबांना अर्पण केले होते. हे कमळाचे फुल साईंना धूपारतीच्या वेळी चढवण्यात आले होते. आपले दान साईबाबांना पावल्याचे समाधान भाविकाने व्यक्त केले होते. अत्यंत सुबक कारागिरी आणि आकर्षक रेखीव काम केलेले हे फुल होते. हे फुल हैद्राबादमध्येच तयार करण्यात आलेले होते. भाविकांकडून साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात आलेले कमळ साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी स्विकारले होते. भाविक नेहमी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर साईबाबांचा आशिर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले होते. नववर्षाच्या प्रारंभदिनी एका भाविकाने साईबाबांना तब्बल 47 लाखांचा मुकूट अर्पण केला होता.