श्रीरामपूर ( अहमदनगर ) - शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं ( Maharashtra Political Crisis ) आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड पुकारलं आहे. यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे आणि ठाकरे समर्थकांकडून समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात आहे. आता श्रीरामपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनाचे बॅनर लावले ( congress banner against rebel shivsena mlas in shrirampur ) आहेत.
श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयाजवळ हे बॅनर लावले आले. या बॅनरवर ‘साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’, असा मजकूर लिहिलेला आहे. भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शहराध्यक्ष संजय संजय छल्लारे यांनी गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर तर भाजप कार्यकर्ते बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. तर, आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
छल्लारे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आता घरोबा नको तर नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी अट घालत एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. कडवट शिवसैनिक अशी ओळख असणारे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्यासह सेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारत आधी सुरत आणि नंतर थेट गुवाहाटी गाठली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. ठाकरे सरकारचे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून ठिकठिकाणी निदर्शने तसेच आक्रमक आंदोलनं केली जात आहेत. मात्र, आता शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते देखील उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावल्याचं बघायला मिळतंय.
याबाबत बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी म्हटलं की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजाचा वारसा लाभला आहे. शिवसेनासारख्या पक्षामध्ये असे गद्दार लोकं जन्माला येणे हे दुर्देव आहे. शिवसेनेच्या जिवावर मोठे होवून अडीच वर्षे फायदे घेतले. अडीच वर्षापुर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती करण्यास नकार द्यायला हवा होता. आता कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली बंड पुकारलं याचं श्रीरामपुर काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत आहे.