कोपरगाव Leopard In Kopargaon : गेल्या दोन दिवसांपासून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. कोपरगाव शहरात मंगळवारी दुपारी खांदक नाल्याच्या परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने चार तास अथक प्रयत्न करून अखेर बिबट्याला जेरबंद केलंय. बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांनी वनविभाग, पोलीस प्रशासनाचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय.
नागरिकांवर बिबट्याचा हल्ला : कोपरगाव शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या बिबट्याचे अनेकांना स्थानिक नागरिकांना दर्शन झाले होते. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमीही झाले होते. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, असं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय.
बिबट्याचा नागरिकांवर हल्ला : भक्ष्याच्या शोधात फिरणारे बिबट्या ग्रामीण भागातून शहरी भागात आल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. कोपरगाव शहरात गेल्या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यानं नागरिकांवर हल्ला करून जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होते. रहदारी रहिवासी भागात बिबट्यांचा वावर वाढल्यानं नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते.
परिसरात बिबट्याचा वावर : या प्रकरणी आमदार आशुतोष काळे यांनी स्वत: शासकीय अधिकाऱ्यांसह कोपरगाव शहरातील बिबट्या दिसलेल्या परिसराची पाहणी केली होती. आशुतोष काळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले असून बिबट्या जेरबंद झाला आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश : कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनीही घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी बिबट्याच्या मोहिमेत भाग घेत वनविभागाला मदत केलीय. त्यामुळं बिबट्याला लवकर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय.
हेही वाचा -