अहमदनगर : महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्याने अनेक परराज्यातील लोकांनी घरची वाट धरली आहे. संचारबंदीचे काटोकोर पालन करण्यासाठी पोलिसांनी रात्री नाकाबंदी केली. यावेळी अहमदनगर - मनमाड महामार्गावरुन जाणाऱ्या दोन खासगी बस प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक करताना आढळल्या. या खासगी बसवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करत 80 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोपरगाव शहरात शहर पोलिसांनी रात्रीच्या नाकबंदी दरम्यान पुण्याहून उत्तरप्रदेश, इटावा तसेच दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या दोन खासगी ट्रॅव्हल्स तपासणीसाठी थांबवल्या. तपासणी केली असता त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी आढळून आले. ज्या ठिकाणी 30 प्रवाशांची क्षमता आहे, त्या ठिकाणी या वाहनांमध्ये 90 ते 100 प्रवासी आढळून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याने दोनही ट्रॅव्हल्सचे मालक, ड्रायव्हर यांच्यासह प्रत्येक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, याची माहिती कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.