अहमदनगर - कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या चार दिवसांकरता कोपरगाव शहर लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. हा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. या काळात होम टू होम तपासणी केली जाणार आहे.
कोपरगाव शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या भागात वैद्यकीय पथकाद्वारे 'होम टू होम' तपासणी करण्यात येणार येत आहे. मागील 15 दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढता असल्याने या संदर्भात तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली. यात कोपरगाव शहर चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले, सुरुवातीला कोपरगाव शहरात रुग्ण संख्या खूप कमी होती. मात्र आता शहरांमध्ये अधिक रुग्ण असून त्यातही शहरातील दहा भागांमध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोपरगाव शहरातील टिळक नगर, गांधी नगर, महादेव नगर, समता नगर, निवारा, सुभद्रानगर, सप्तर्षी व काले मळा या भागात वैद्यकीय पथके नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत या चार दिवसात प्रत्येक घराचा सर्व्हे करण्यात येत आहे.
वयस्कर व वृद्ध व्यक्तींची ऑक्सिजन तपासणी करून जर संशयित आढळल्यास रॅपिड टेस्टसाठी शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे या चार दिवसांत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून परिस्थिती नियंत्रणात राहील, याची काळजी घेण्यात येणार आहे. मूळात रुग्ण व त्यांना उपचार मिळावे यासाठी हा सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे या चार दिवसाच्या काळात अत्यावश्यक सुविधा, वैद्यकीय सुविधा, बँका पतसंस्था तसेच दूध सकाळी 5 ते 8 यावेळेस सुरू असून या काळात सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे देखील, प्रशांत सरोदे यांनी सांगितले.
हेही वाचा - 'भाजप नेत्यांना जनतेचा कळवळा असता तर केंद्रातून जीएसटीचे पैसे आणले असते'
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोरोना काळात गर्भवती महिलांचा जीव टांगणीला, पुरेशा खाटा नसल्याने अडचणी