अहमदनगर - 20 व 21 जुलैला राज्यभर दूध संकलन केंद्रांवर दुधाचा अभिषेक करून व 1 ऑगस्ट रोजी चावडीवर जनावरे बांधून दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले होते. मात्र, सत्तेतीत अनेकांचे हितसंबंध दूध कंपन्या व दूध संघांसोबत असल्याने सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे.
लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण देत राज्यातील दूध संघ व कंपन्यांनी दुधाचे खरेदी दर 10 ते 12 रुपयाने कमी केले आहेत. विक्री दरामध्ये मात्र केवळ जुजबी 2 रुपयांची कपात करण्यात आली. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी व ग्राहकांची कोट्यवधींची लूट केली जात आहे. शेतकरी व ग्राहकांची ही लूट थांबविण्यासाठी संघर्ष समिती सातत्याने आंदोलन करत आहे. मात्र, आपली भागीदारी असलेल्या दूध पावडर कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकारमधील काही घटक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत असल्याचे अजित नवले म्हणाले.
हेही वाचा - कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्राकडून पदक जाहीर
राज्यात प्रतिदिन 20 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत असताना व 55 हजार टन दूध पावडर पडून असताना राज्य सरकारकडून महिन्याला केवळ 450 टन दूध पावडर गरिबांना वितरित करून प्रश्न सोडविल्याचा आव आणला जात आहे. दूध प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचे हे द्योतक आहे. राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या काही घटकांचे हितसंबंध दूध व्यवसायात व शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या लुटीत सामावलेले असल्याने त्यांच्याकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.