अहमदनगर: नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नावर मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात उपोषण सुरु झाले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांच्या खड्डेमुक्त शहराच्या (Pothole free city) मागणीसाठी मुंबईत एल्गार करीत शिंदे - फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis Govt) लक्ष वेधले आहे. कर भरणाऱ्या नगरकरांना साधे रस्ते सुद्धा न मिळणे ही शरमेची बाब आहे. शहराचे नेतृत्व करणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांसाठी मला मुंबई गाठावी लागली, असा घणाघात काळेंनी मुंबईतून केला आहे.
आझाद मैदानात आंदोलन: एकीकडे शहरात उड्डाणपूल उद्घाटनाची लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे काळेंच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सकाळी साडेदहा वाजता शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणामध्ये काळें समवेत मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, उपाध्यक्ष गौरव घोरपडे, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
नगरच्या खड्यांचे मुंबईत प्रदर्शन: यावेळी उपोषणकर्त्यांच्या हातामध्ये खड्डे कधी बुजणार ? रस्ते कधी होणार ? नगर शहरात विकासपर्व केव्हा अवतरणार ? अशा आशयाचे फलक झळकत होते. वाढदिवसाच्या हार-तुर्यांना फाटा देत काळेंनी नागरिकांना खड्ड्यांचे फोटो भेट पाठवण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद नगरकरांनी दिला होता. काळेंनी या फोटोंचे चक्क जाहीर प्रदर्शनच आझाद मैदानात भरवले आहे.
आमदार असतो तर विधानसभेत बसलो असतो: नगर मध्य शहर, बोल्हेगाव परिसर, सावेडी उपनगर, केडगाव, कल्याण रोड परिसर, मुकूंद नगर असे वेगवेगळे विभाग करीत शहराच्या दयनीय अवस्थेकडे शासनाचे काँग्रेसने यामाध्यमातून लक्ष वेधले आहे. काळे म्हणाले की, मी आमदार असतो तर नगरकरांसाठी विधिमंडळ अधिवेशनात सभागृहातच उपोषणाला बसलो असतो.
आ.संग्राम जगताप यांच्यावर निशाणा: ज्यांच्यावर शहर नेतृत्वाची जबाबदारी आहे त्यांनी शहराच्या कोणत्याच मुद्द्यावर कधी विधानसभेत आवाज उठविला नाही. दोन टर्म विधान परिषदेत शहरातून प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी नगरकरांसाठी विधीमंडळात कधी ब्र सुद्धा काढला नाही. मनपात अधिकारी दहशतीखाली काम करतात. 'त्यांचा' आदेश आल्याशिवाय टाचणी सुद्धा हालत नाही.
रस्त्याची कामे न होण्यामागे राजकारण: वर्षभरावर मनपाची सार्वत्रिक निवडणूक आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामे करू. तोपर्यंत रस्त्यांच्या कामांना हात लावायचा नाही, असा फतवाच 'त्यांनी' काढला आहे. स्वतःच्या घरापासून कार्यालयापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांच्या आपल्या खाजगी कार्यालयात बैठका घेणाऱ्यांना शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेसे वाटत नाही. हे नगरकरांचे दुर्भाग्य असल्याचे काळेंनी म्हटलें आहे.